माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.आपणांस विविध शैक्षणिक माहिती देण्याचा माझा प्रयत्न आपणांस नक्की आवडेल. आपल्या प्रतिक्रिया नक्की दया...धन्यवाद.. कोरोनावर मात करूया.घरी रहा सुरक्षित रहा.आपल्या बरोबरच परिवाराचीदेखील काळजी घ्या

Thursday, 1 October 2020

माझ्या मनातील आदर्श शाळा

 भारत देशाचा आदर्श भावी नागरिक निर्माण करण्यासाठी, विद्यार्थ्यांचा सामाजिक, भावनिक, शारीरिक, बौद्धिक, मानसिक असा सर्वांगीण विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणारी, विविध विषयांचे मूलभूत संबोध भक्कम करणारी, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करणारी, विद्यार्थ्यांच्या अध्ययनात पोषक वातावरण निर्माण करणारी, विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन त्यांना त्या विषयात योग्य ते मार्गदर्शन करणारी, मानवी जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्य करणारी, विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्ये जोपासणारी व संस्कारक्षम विद्यार्थी घडवणारी संस्था म्हणजे आदर्श शाळा होय.

आदर्श शाळा होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक म्हणजे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, समाज आणि शाळेतील भौतिक सुविधा.

मुख्याध्यापक हा शाळेचा आरसा असतो असे म्हणतात ते उगाच नाही. शाळा पाहिल्यानंतरच त्या मुख्याध्यापक कसा असेल हे समजते. मुख्याध्यापक असा असावा की त्याने शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होण्याच्या दृष्टीने शिक्षकांचे योग्य समन्वय ठेवून नियोजन आणि आराखडा अतिशय उत्कृष्ट बनविणे, विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होण्यासाठी योग्य असे वातावरण निर्माण करण्यासाठी नियोजन करणे आणि नियोजनाची योग्य प्रकारे अंमलबजवणी करण्याचा दृष्टिकोन आणि योग्य ती पात्रता असणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांनी  विविध शालेय कार्यक्रमांत समाजाला सहभागी करून घेतले पाहिजे.

शिक्षक असे असावेत की येथे मुख्याध्यापकांना योग्य ते सहकार्य करणारे ,त्याचबरोबर आपल्या विषयांमध्ये  पारंगत असावेत. शाळेचे नियोजन करताना त्यांचा योग्य असा दृष्टिकोण आणि त्यांचे ज्ञान हे काळाच्या अनुषंगाने बदलणारे असावे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने त्यांनी शाळेच्या नियोजनामध्ये योग्य सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती जाणून घेऊन त्यावर योग्य ती उपाययोजना करणारे, मुलांच्या भावना जाणून घेणारे, विद्यार्थ्यांचा कल पाहून त्यामध्ये त्याची कौशल्य वृद्धिंगत करणारे, तंत्रज्ञानाचा शिक्षणात उपयोग करणारे, वाचनाचा छंद असणारे, विद्यार्थ्यांचे विषयांचे  मूलभूत संबोध पक्के करणारे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत सामोरे जाण्यास प्रवृत्त करणारे, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा शंभर टक्के सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणारे, स्वतःला झोकून देऊन काम करणारे शिक्षक असावेत.

विद्यार्थी असे असावेत की त्यांनी शाळेसाठी दिलेले नियम योग्य पद्धतीने पाळणे पाहिजे. त्याचबरोबर घरी दिलेला अभ्यास त्यांनी वेळच्या वेळी पूर्ण केला पाहिजे. तसेच विविध  शालेय व सहशालेय उपक्रमांमध्ये  सहभागी होणारे असावेत. शाळेचे सर्व नियम व्यवस्थितपणे पाळून शाळेच्या  भौतिक सुविधेचा योग्य वापर  करणारे असावेत.

विद्यार्थ्यांना शाळेत शैक्षणिक वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने सर्व भौतिक सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामध्ये प्रथमता ई-लर्निंग ची सुविधा असणाऱ्या शाळा वर्गखोल्या, बसण्याची सुविधा, लाईट, फॅन या सर्व सुविधा वर्गात उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शाळेत प्रयोगशाळा, वाचनालय, ग्रंथालय या सुविधा उपलब्ध असाव्यात. शाळेला स्वच्छता गृह योग्य त्या प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मुलींसाठी स्वतंत्र खोली असणे अत्यंत आवश्यक आहे. शाळेला योग्य असा परिसर, प्रत्येक खेळाची आखलेली मैदानी, बगीचा व वृक्षसंवर्धन शाळेला कंपाउंड असणे गरजेचे आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांना शालेय परिसरात हेडक्वार्टर्स उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शालेय व सहशालेय उपक्रम शाळेमध्ये राबवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ क्रीडास्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, स्नेहसंमेलन, क्षेत्रभेटी, शैक्षणिक सहल, नेत्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या कार्यक्रम, शास्त्रज्ञांविषयी माहिती,विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती आशा विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी निर्माण करुन दिली पाहिजे तर खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडू शकतील.

No comments:

Post a Comment

सेतू अभ्यास

  सेतू अभ्यास (इयत्तनिहाय ) इयत्ता निहाय सेतू अभ्यासासाठी खालील नावावर क्लीक करा   Download